- तर, चिखलीतील संध्या आणि नंध्यास पालखी सोहळ्याची सेवा करण्याचा मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथास श्रीक्षेत्र देहुगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र देहूगाव परतीच्या प्रवासासाठी बैलजोडी जुंपण्याचा मान हभप निखिल सुरेश कोरडे (रा. नांदेड सिटी, खडकवासला) यांच्या मल्हार आणि गुलाब या बैलजोडीला मिळाला आहे.
तसेच, पै. सुरज ज्ञानेश्वर खांदवे (रा. लोहगाव, ता. हवेली) यांच्या हिरा आणि राजा नावाच्या बैलजोडीस आणि बाळासाहेब सोपान मळेकर (रा. टाळगाव चिखली) यांच्या संध्या आणि नंध्या या बैलजोडीस चौघडा गाडीस बैलजोडी लावून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सेवा करण्याचा मान मिळाला आहे.
संत तुकाराम महाराज ३३९ व्या पालखी सोहळ्याचे येत्या २८ जूनला श्रीक्षेत्र देहगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यानुसार देहू देवस्थान संस्थानने पालखी रथ आणि चौघडा गाडीस बैलजोडी जोडण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून २६ बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सर्व बैलजोड्यांची पाहणी केली.
संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी सुरज ज्ञानेश्वर खांदवे, हभप निखिल सुरेश कोरडे यांच्या बैलजोडीची निवड केली. तर, चौघडा गाडीसाठी टाळगाव चिखलीचे बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या बैलजोडीची निवड केली.
संत तुकाराम महाराज पालखी रथास आपली बैलजोडी जोडून संत तुकोबांची सेवा करण्याची संधी मिळावी ही अनेक वर्षापासून खूप इच्छा होती. त्यासाठी सात ते आठ वेळा अर्जही केले होते. यावर्षी तुकोबारायांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आमच्या कुटुंबाचे सार्थक झाले आहे. – पै. हभप निखिल सुरेश कोरडे…