- वाघेरेंना ‘मशाल’ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश..
- पनवेल, चिंचवडने दिले निर्णायक मताधिक्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- यंदा श्रीरंग बारणेंना अस्मान दाखवायचेच, या इराद्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादीतून आलेल्या संजोग वाघेरे-पाटील यांना मावळमधून उमेदवारी दिली. मात्र त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेता आले नाही. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणारी सहानुभूतीही ‘कॅश’ करता आली नाही. नव्या चिन्हावर लढणाऱ्या वाघेरेंना ‘मशाल’ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले आणि शहरी मतदारांनी मोदीकडे पाहत महायुतीच्या बारणेंना कौल दिला.
शिवसेना फुटल्यानंतर दोनदा खासदारकी मिळवणाऱ्या बारणेंनी एकनाथ शिंदे यांचा गट जवळ केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा निर्धार उद्धव ठाकरे गटाने केला होता. मात्र त्यांच्याकडे तगडा उमेदवार नव्हता. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी हे नेमके हेरले आणि ‘मातोश्री’ गाठून शिवबंधन बांधले. तेव्हाच त्यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यांची उमेदवारी बारणेंच्या आधी जाहीर झाली.
बारणेंचे तिकीट जाहीर होण्यास विलंब लागण्यामागचे कारण होते, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा विरोध. संपूर्ण मतदारसंघात ताकद जादा असल्याने भाजपने उमेदवारीवर दावा केला, तर शिंदे गट कमजोर असल्यामुळे राष्ट्रवादीने तिकिटाची मागणी केली. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठा पणास लावून महायुतीच्या नेत्यांना मनवले आणि ही जागा पदरात पाडून घेतली.
प्रत्यक्ष प्रचारावेळी सुरुवातीस भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट बारणेंसोबत दिसत नव्हता, पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर सगळे कामाला लागले. मागील निवडणुकीत बारणेंने अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना पाणी पाजले होते. त्यामुळे त्यांचा गट बारणेंची जिरवणार असल्याचे दिसत होते. मात्र नंतर हा गट थंड राहिला. त्यांचे नेते- कार्यकर्ते शिरूर आणि बारामतीतील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले, त्यांचा उपद्रव कमी झाला. त्याचवेळी बारणेंनी ‘मला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार सुरू केला. त्याचा परिणाम भाजप आणि आरएसएसची यंत्रणा धावायला लागली. मोदींना मत मागण्याचे आवाहन प्रभावी ठरले.
पनवेल, चिंचवडने दिले निर्णायक मताधिक्य..
राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड आणि त्याखालोखाल मतदार असलेल्या पनवेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत ६ लाख २८ हजार ६७३ मतदान झाले. चिंचवडमध्ये सर्वाधिक ३ लाख २२ हजार ७००, तर पनवेलमध्ये २ लाख ९५ हजार ९७३ मतदारांनी हक्क बजावला. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. त्यावरच बारणे यांची भिस्त होती आणि दोन्ही मतदारसंघांनी त्यांना भरभरून मते दिली. त्यावरच त्यांना ९६ हजारांचे मताधिक्य गाठता आले.
उद्धव ठाकरे गटाचे चुकले कुठे?..
उद्धव ठाकरे गटाला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीना सोबत घेता आले नाही. पिंपरी-चिंचवड, मावळमधील राष्ट्रवादीचा शरद पवार गट शेजारच्या शिरूर आणि बारामतीतील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात दिसत होता, तर क्षीण झालेली काँग्रेस गायब होती. त्यातच पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती वाघेरेंना ‘कॅश करता आली नाही. शिवाय नव्या चिन्हावर लढणाऱ्या वाघेरेंना ‘मशाल’ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले. तेथेच त्यांचा पराभव झाला.