न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२४) :- लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये झाली. यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुखांकडून विधानसभा निहाय माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. आठवडाभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. विधानसभा निहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभा निकालात विधानसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य, या सगळ्यांचा अहवाल विधानसभा संपर्कप्रमुखांना आठवड्याभरात सादर करायचा आहे.
महाविकासआघाडीमध्ये ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे, त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल. महाविकासआघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी 288 जागांची तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या विधानसभा संपर्कप्रमुखांना केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल? याचा अहवाल उद्धव ठाकरेंनी मागवला आहे. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल? याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागवला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वत:च्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही? याबाबतचा अहवालही ठाकरेंनी मागवला आहे.















