- महापालिका प्रशासनावर लोकांची नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२४) :- आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचा निवारा देण्यासाठी बांधण्यात आलेल्या आकुर्डी आणि पिंपरी गृहप्रकल्पातील ९३८ सदनिकांचे वाटप करण्यास महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घरासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि राहत्या घराच्या किरायाचा बोजा डोक्यावर आल्याने लाभार्थी पार मेटाकुटीला आले आहेत. डोक्यावरचा आर्थिक भार कमी करुन हक्काच्या घरात विश्रांती घेण्याची लाभार्थ्यांना प्रतिक्षा लागली होती; परंतु महापालिकेकडून त्यांची उपेक्षाच झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी आरक्षण क्र. २८३ व पिंपरी आरक्षण क्र. ७७ येथे आर्थिकदृष्ट्या दुबल घटकांसाठी घरे बांधली आहे. आकुर्डी येथील गृहप्रकल्पात एकूण ५६८ सदनिका आहेत. पिंपरीतील प्रकल्पात ३७० सदनिका आहेत. आकुर्डीत १२ मजली ६ इमारती आहेत. तर. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील उद्यमनगर येथे १२ मजली २ इमारती आहेत. दोन्ही गृह प्रकल्पातील एकूण ९६८ सदनिका वाटपाअभावी धुळखात पडल्या आहेत. घरासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २८ जून २०२३ रोजी राबविण्यात आली. त्यावर तब्बल १० हजार नागरिकांनी अर्ज केले. त्याची छाननी करण्यासाठी कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडून हाती घेतली, त्यानंतर ९३८ विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यासोबतच प्रतिक्षा यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे.
आकुर्डी प्रकल्पातील घराची किंमत ९ लाख ८५ हजार २५५ इतकी असून पिंपरी प्रकल्पातील घराची किंमत १० लाख ४२ हजार ६९९ रुपये आहे. घरासाठी बँकेचे कर्ज घेतले आहे. तर, काहीनी अर्थ पुरवठा करणा-या खासगी बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतले आहे. त्यातील काही लाभार्थ्यांना बँकेकडून हप्ते देखील सुरु झाले आहेत. त्यामुळे घर मिळायच्या अगोदरच लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. तसेच, जून २०२३ मध्ये अर्जप्रक्रिया राबवून सोडत काढल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरांचे वाटप होणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेकडून घरांचे वाटप वेळेवर न करता ही प्रक्रिया वर्षभर प्रतिक्षित (होल्डवर) ठेवण्यात आली. दोन्ही प्रकल्पातील घरांचे वाटप कधी होणार? याबाबत लाभार्थ्यांना महापालिकेने अद्यापही ठोसपणे सांगितलेले नाही. तब्बल वर्ष उलटून गेल्यानंतही घराचा ताबा मिळत नसाल्याने लाभार्थ्यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
आकुर्डी आणि पिंपरी येथील दोन्ही गृहप्रकल्पातील ९३८ सदनिकांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून निवड व प्रतिक्षा यादी जाहीर केलेली आहे. लवकरच सदनिका वाटपासंदर्भातील पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येईल.
– अण्णा बोदडे, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन…












