न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- कासारवाडी परिसरात इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत हकनाक बालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या पार्शवभूमीवर या परिसरात आणखी इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे भविष्यातही अशाच घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. याबाबत माजी नगरसेवक किरण मोटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
या पत्रात मोटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३० कासारवाडीमधील गुलिस्थाननगर येथील यशवंत प्राईड या इमारतीची सीमाभिंत घरावर अचानकपणे कोसळली. सदर दुर्घटनेत एका ६ वर्षाच्या लहान बालकाचा बळी गेला. तसेच ड्रेनेज विगातील ठेकेदारीवर काम करणारे २ मजुर दुखापतग्रस्त झालेत. भविष्यात देखील अशा दुर्घटनेची पुर्नवृत्ती होऊ शकते.
सदर ठिकाणी साईकुंज, साई विनायक रेसिडन्सी, यशवंत प्राईड व विकासशिल या ४ इमारती आहेत. या इमारतीची मागील बाजूची सिमाभिंत साईनगर य गुलिस्ताननगर या दाट लोकवस्तीत असणा-या भागावर कोसळू शकते. सदर इमारतीचे बांधकाम, बांधकाम व्यावसायिक व विकसकांनी केले आहे. त्यांना आपल्या बांधकाम परवानगी विभागाने विविध परवाने व दाखले दिलेले आहेत. तरी या इमारतीची मजबूती व सिमाभिंतीचे काम योग्य नसल्याचे झालेल्या दुर्घटनेतून समोर आलेले आहे.
तरी सदर इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक यांना आपल्या बांधकाम विभागातर्फे सूचना देऊन, त्वरीत नव्याने सर्व इमारतींच्या सिंमाभिंती योग्यप्रकारे बांधून देण्याचे आदेश द्यावेत व परिसरातील नागरिकांच्य मनात असलेली दहशत व भिती दुर करावी.











