न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने रविवारी (१८ ऑगस्ट) जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे जनसन्मान यात्रा आयोजित केली होती. मात्र या कार्यक्रमासाठी नारायणगावात आलेल्या अजित पवारांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांनी कार्यक्रमस्थळी निदर्शने केली.
भाजपाच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कोणीही महायुतीच्या एकतेला गालबोट लावू नये.”
अजित पवारांच्या पक्षाने नारायणगावात जनसन्मान यात्रेसह पर्यटन आढावा बैठक देखील बोलावली होती. मात्र या ठिकाणी भाजपा किंवा शिवसेनेच्या शिंदे गटाचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो किंवा त्यांचा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन काळे झेंडे दाखवले. तसेच या बैठकीसाठी भाजपाला निमंत्रण नसल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावर सुनील तटकरे म्हणाले, “मुळात त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचं काही कारण नाही, त्यांनी निदर्शने करण्याची आवश्यकता नव्हती. कारण हा आमच्या पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम आहे.”












