- सुलभा उबाळे यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- भाजप नेत्याशी संबंधित ठेकेदार कंपनीने दुसऱ्या कंपनीला हाताशी घरून महापालिकेतील शाळांच्या साफ सफाई कामात रिंग केली आहे. या ठेकेदाराने अशाच प्रकारचा कारनामा बृहन्मुंबई महापालिकेतही केला होता. रिंग करून इतर ठेकेदारांना निविदा भरू दिली जात नाही, असा आरोप करून ती निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी पत्रकार परिषद केली आहे.
या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे पाटील, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेना शहर अधिकारी चेतन पवार, युवा सेना जिल्हाधिकारी सचिन सानप, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, अनंत कोर्हाळे, शहर संघटक संतोष वाळके, तुषार सहाने, दादा नरळे आदी उपस्थित होते.
सुलभा उबाळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्व शाळेची यांत्रिकीकरणाद्वारे दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. या कामासाठी सहा कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. क्रिस्टल व ब्रिक्स या कंपन्या वगळता चार कंपन्यांना अपात्र ठरविण्यात आले. ज्या दोन कंपन्यांना पात्र केले आहे, त्यांनी निविदेपेक्षा जास्त दर भरले आहेत. खर्च ४६ कोटीवरून ६१ कोटीवर नेण्यात आला आहे. क्रिस्टल कंपनीने ब्रिक्स कंपनीला हाताशी धरून रिंग केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
क्रिस्टल कंपनीचे संचालक हे भाजपच्या एका आमदाराचे जवळचे नातेवाईक आहेत, ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांनी पालकमंत्री व त्यांच्या मुलाचे नाव घेत अधिकाऱ्याशी जवळीक साधली आहे. रिंगचा प्रकार स्थानिक आमदारांची मदत घेऊन सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.












