न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- मनपामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. या पदावर कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार लाखभर असून अनेक विभागात त्यांचा पगार विभागप्रमुखांपेक्षा अधिक आहे. मनपाच्या आस्थापनेवरील कॉम्प्युटर ऑपरेटर यांचे नक्की कामकाज काय आहे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे अनेक कॉम्प्युटर ऑपरेटर हे त्यांना त्यांच्या विभागाने नेमून दिलेले कामकाज करण्यास नकार देतात व दिवसभर बसून फक्त कॉम्प्युटरवर खेळत बसताना दिसून येतात.
अनेक विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर दिवसभर फक्त आलेल्या ई- मेलच्या प्रिंट काढणे, ई मेल करणे एवढंच कामकाज करून या कामकाजाचा लाखो रुपये पगार घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक विभागांमध्ये हे कामचुकार कॉम्प्युटर ऑपरेटर विभागाची डोके दुखी झालेले आहेत. त्यांच्या लाखो रुपये पगारामध्ये अनेक गरजू व होतकरू तरुण काम करण्यास इच्छुक असल्याचे अनेक विभागप्रमुख बोलून दाखवत आहेत.
वास्तविक पाहता मनपामध्ये सध्या नियुक्त कॉम्प्युटर ऑपरेटर पैकी अनेकजणांनी केवळ डिप्लोमाचे शिक्षण घेतले असून त्यांचा पगार मनपामधील इंजिनियर अधिकारी/कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक आहे. मनापामध्ये शिपाई देखील या कॉम्प्युटर ऑपरेटरांपेक्षा अधिक कामकाज करित असल्याचे दिसून येत आहे. अनेक कॉम्प्युटर ऑपरेटरांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले गोपनीय अहवाल देखील जमा केलेले नाहीत. यावरून ते प्रशासनाला देखील भीक घालत नसल्याचे दिसून येते.
अनेक विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर काम नसताना देखील कार्यालयीन वेळेनंतर थांबून अतिकलिन भत्ता देखील घेत असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी येथील एका हॉटेलमध्ये वेतनवाढीसाठी मनपामधील कॉम्प्युटर ऑपरेटर कर्मचाऱ्यांनी एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये वेतनवाढीचे कामकाज करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यासाठी वर्गणी देखील काढण्यात आली. तळमजल्यावरील विभागातील एका कॉम्प्युटर ऑपरेटर कर्मचाऱ्याने या संपूर्ण बैठकीचा खर्च केल्याचे समजते.
सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा एकदा कॉम्प्युटर ऑपरेटर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची फेररचना करावी. अन्यथा या कर्मचाऱ्यांच्या वेतनापायी मनपाची तिजोरी रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांच्या जॉब चार्टमध्ये फेरबदल करून ऑनलाईन ट्रॅकिंग करणे, ऑनलाईन इनवर्ड/आऊटवर्ड करणे तसेच संगणकीय कामकाज करणे आदी बाबींचा समावेश करावा.
– संतोष सुर्वे, पिंपरी…












