न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- देहू नगरपंचायतीकडून वाहनतळाची (पार्किंग) शुल्क वसुली करण्यासाठी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र शुल्क वसुलीची तब्बल ३४ बनावट पावती पुस्तके कार्यालयाबाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये डिसेंबर २०२२ कालावधीतील तारीख नमूद असून कामगारांनी पावत्या फाडून जमा झालेली रक्कम कार्यालयाकडे न देता एका कर्मचाऱ्याकडे दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणावरून नगरपंचायतीत मोठा घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे.
नगरपंचायतीची वाहनतळ पावती पुस्तके आरोग्य निरीक्षकांनी छापली होती; मात्र पावती पुस्तकांचे तीन-तीन समान क्रमांकांचे संच आढळून आले आहेत. एक संच कार्यालयात असून, त्यातील काही पुस्तके गहाळ झाली असून, दोन संच बाहेर सापडले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी संगनमत करून वाहनतळ वसुलीची दोन अतिरिक्त पुस्तके छापून वसुली केली. ती रक्कम कार्यालयात जमा केली नसल्याने, नगरपंचायतीला फसवल्याचे उघड झाले आहे.
याबाबत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत लेखी खुलासा सादर करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करून यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचे प्रमुख सूत्रधार कोण आहेत, याचा तपास करून हा भ्रष्टाचार निपटून काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देहू नगरपंचायतीने वाहनतळ वसुलीसाठी चारवेळा निविदा भागविल्या होत्या. यामध्ये पंधरा लाख ३० हजार रुपयांची बोली लावली होती; मात्र काही नगरसेवकांनी यापेक्षा जास्त बोलीची अपेक्षा आहे, असे सांगत संबंधित बोलीधारकाची निविदा नाकारली. यामुळे गेल्या दोन वर्षांत वाहनतळ शुल्क वसुली कंत्राटी कामगारांमार्फत सुरू आहे. आता बनायट पावती पुस्तके सापडल्याने या वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.















