- विकासक आणि एजंट यांना महारेराशी व्यवहार करणे अधिक सोपे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- बांधकाम प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण, तसेच ग्राहकांना तक्रार करण्यासाठी महारेराने आता स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले असून, त्याचे काम १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यामुळे विकासक आणि एजंट यांनाही महारेराशी व्यवहार करणे अधिक सोपे व्हावे असे मॉड्यूल्स राहणार आहेत. यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यासोबतच या नवीन संकेतस्थळामुळे स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शकता वाढणार आहे. यात कृत्रिम प्रज्ञेचाही वापर केला जाणार आहे.
प्रगत काळाची आव्हाने पेलण्यासाठी काळसुसंगत, वापरकर्ता स्नेही आणि अनेक उपयुक्त फीचर्स असलेले महारेराचे ‘महाक्रिटी’ संकेतस्थळ आता अंतिम टप्प्यात आहे. हे नवीन संकेतस्थळ महा-क्रिटी म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी अशा नावाने ओळखले जाईल. सध्या महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण आणि दुरुस्त्या, एजंटची नोंदणी आणि नूतनीकरण आणि घर खरेदी करार आणि त्याबाबतच्या तक्रारी, अशी कामे केली जातात.
सध्याचे संकेतस्थळ १३ ते ३१ ऑगस्ट या काळात प्रवर्तक आणि एजंटांसाठी बंद राहील. घर खरेदीदारांना नेहमीप्रमाणे सुविधा सुरु राहतील. मात्र, २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ३१ ऑगस्टपर्यंत त्यांना ऑनलाइनऐवजी स्वतः अर्ज करावे लागतील. तक्रारींच्या सुनावण्या नेहमीप्रमाणे सुरूच राहतील. जुन्या संकेतस्थळावरून नवीन संकेतस्थळावर माहिती स्थलांतरित होणार असल्याने या काळात सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले आहे.
महारेराने २०१७ मध्ये सुरू केलेल्या संकेतस्थळात आमूलाग्र बदल केले आहेत. महारेराच्या संकेतस्थळाचा वापर काही महिन्यांपूर्वी दिवसाला ५ हजार आणि तासाला २०० होता. आता हा वापर दिवसाला ३४ हजारांपेक्षा जास्त आणि तासाला १४०० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे महारेराचे संकेतस्थळ यादृष्टीने काळसुसंगत, अद्ययावत, वापर स्नेही आणि वाढत्या अपेक्षांची आव्हाने समर्थपणे पेलणारे असावे यासाठी नियोजन केले.
– अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा…











