न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला मदत करणाऱ्या ठगास पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर सेलने उल्हासनगर, मुंबई येथे ही कारवाई केली. अजयकुमार किशनलाल आर्या (रा. उल्हासनगर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले. ग्रुपवरील कंपनीला सेबीची मान्यता असल्याचे खोटे सांगून शेअर ट्रेडींग केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे त्यांना आमीष दाखविले. शेअर ट्रेडिंगच्या नावाने वेगवेगळ्या बँक खात्यावरून २० लाख २४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
या गुन्ह्याचा सायबर सेलकडून समांतर तपास सुरू होता. दरम्यान, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वेगवेगळया बँक खात्याचा वापर केल्याचे तपासात दिसून आले. यातील एक खातेधारक आरोपी हा उल्हासनगर, मुंबई येथील असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त झाली. त्यानुसार, सायबर सेलचे एक पथक तपासाकरिता उल्हासनगरला पाठविण्यात आले. पोलिसांनी संबंधित खाते धारकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. त्या वेळी त्याने आपले बँक खाते आरोपी अजयकुमार आर्या याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी आर्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने साथीदार परमान साजीद अली खान आणि निखिल सेलवानी यांच्या सांगण्यावरुन मोबदला घेऊन त्यांना बँक खाते दिल्याचे समोर आले. तसेच, स्वतःचे कोटक बँकेतील खात्यावरही काही रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने एटीएममधून पैसे काढून इतर दोन आररोपींना दिल्याचीही कबुली दिली. आरोपी आर्या याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















