- साडेसतरा हजार जागांसाठी सतरा लाख उमेदवार स्पर्धेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- सन २०२२-२०२३ या वर्षातील रिक्त पदांची भरती करण्याकरीता राज्य शासनाने मंजूरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात (दि. ०५/०३/२०२४) रोजी प्रसिध्द करण्यात आली. पोलीस शिपाई ९,५९५ पदे, चालक पोलीस शिपाई १,६८६ पदे, बॅण्डस्मन ४१ पदे, सशस्त्र पोलीस शिपाई ४,३४९ पदे, कारागृह शिपाई १,८०० पदे असे एकूण १७,४७१ पदे भरण्याकरीता जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी एकूण १६,८८,७८५ इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते. (दि. १९) पासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेणेबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा. मुंबई यांनी दिली आहे.
पोलीस शिपाई पदाचे एकूण ९,५९५ रिक्त पदांकरिता एकूण ४६ जिल्हा, आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी ४५ जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडपात्र ७,०२३ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरु आहे.
चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण १,६८६ पदांकरिता एकूण २६ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी २४ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरु आहे.
बॅण्डस्मन पोलीस शिपाई यांची एकूण ४१ पदांकरिता एकूण १४ जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी १३ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून १७ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंबई शहरची प्रक्रिया सुरु आहे.
राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ गटामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व ठिकाणी ४,३४९ निवडपात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कारागृह शिपाई यांची १,८०० पदांकरिता ४ घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. अशाप्रकारे एकूण १७,४७१ रिक्त पदांपैकी ११,९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरु आहे व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकर कर्तव्यार्थ हजर होतील.
या ११,९५६ निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील २,८९०, आर्थिक दुर्बल घटक १,१३२, एसईबीसी १,०९७, इमाव २,५४२, विमाप्र २९३, भज-ड-२४५, भज-क-४४५, भज-ब-३३४, विजा-अ-३४४, अज-१,०९८, अजा-१,५३९ याप्रमाणे समावेश आहे. या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत मुलभूत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे.