न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- बदलापुरात दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात जमावाने मंगळवारी आंदोलन केले. याप्रसंगी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना अर्वाच्च भाषा वापरली होती. याप्रकरणी आता त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे.
बदलापुरातील ज्या शाळेत घटना घडली त्या ठिकाणी पत्रकार मोहिनी जाधव ही बातम्या कव्हर करण्यासाठी गेली होती. यावेळी शिंदे गटाचे बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष असलेले वामन म्हात्रे मोहिनी जाधव यांना पाहून थांबले आणि हे प्रकरण तुम्ही पत्रकारांनी पेटवले असल्याचे बोलू लागले.
यावेळी त्यांनी मोहिनी जाधव यांना जसं काही तुझ्यावरच बलात्कार झाला, अशा बातम्या देत आहेस, अशी अर्वाच्च भाषा वापरली. वामन म्हात्रे यांचे शब्द मोहिनी जाधव यांना खटकले आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठत वामन म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली नाही. यानंतर वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागल्याने त्यांच्यावर अॅट्रॉसीटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.