न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदासाठी दोन ते तीन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून त्यांच्या मुंबईच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, मुख्याधिकारी पदासाठी कोणाची वर्णी लागणार ? याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या अगोदरचे नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे, त्यांना राज्य शासनाने ९ जुलैला निलंबित केले. त्यामुळे, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविला. परंतु, लोणावळा शहराचा कारभार मोठा असल्याने त्यांना केवळ १० ते १२ दिवस तळेगावचा कारभार पाहता आला. सध्या त्यांच्या जागेवर वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. येत्या आठवडाभरात नगर परिषदेवर लवकरच नवीन अधिकाऱ्याची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
तळेगाव नगर परिषद ही मोठी असल्याने येथे मुख्याधिकारी म्हणून येण्यासाठी दोन ते तीन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे, याठिकाणी कोण मुख्याधिकारी येणार ? याबाबत अधिकारी आणि कर्मचारी वर्गात चर्चा सुरू आहेत.












