न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अनेक रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साठून पुरसदृश परस्थिती निर्माण होत आहे. महापालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाल्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. काही बिल्डरांनी नाले बुजवून कमी व्यासाचे पाइप टाकलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचून राहत आहे. कमी वेळेत सर्वाधिक पाऊस झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत प्रत्येकी एक ओढा व नाल्याचे अतिक्रमण व बांधकामे काढण्यात येणार आहे. त्यामुळे ओढे व नाल्यावर बांधकामे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
शहरात लोकसंख्यावाढ होऊ लागल्याने अनेक भागांत पुनर्विकास होत आहे. अनेक गावांतील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टी, बंगले तोडून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. परंतु त्या भागातील ड्रेनेजलाइन व स्ट्रॉर्म वॉटर जुनी व कमी क्षमतेच्या असल्याने सांडपाणी तिपटीने वाढल्याने ड्रेनेजलाइन वारंवार तुंबण्याचे प्रकार होत आहेत. काही भागांत जुन्याच ड्रेनेजलाइन आहेत.
शहरात अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि नवीन गृहप्रकल्प होत आहेत. ही बांधकामे, पत्राशेड होताना नैसर्गिक नाले, ओढे, ड्रेनेजलाइन गायब झाले आहेत. महापालिका हद्दीत नैसर्गिक नाले, ओढे हे बिल्डर व्यावसायिकांनी स्थापत्य विभागाकडून ना-हरकत दाखले घेऊन बुजविले आहेत. त्या पाइपची साफसफाई होत नाही. नाले, ओढे बुजविताना भूमिगत पाइप टाकण्यात आलेले असून, ते पाइप कमी व्यासाचे आहेत. अचानक पाऊस जास्त झाला. पाण्याचा योग्य निचरा न होता सखल भागात पाणी साचने, ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अतिक्रमणांमुळे देखील अनेक भागांत नाले तुंबले आहेत. त्यामुळे अतिक्रमण व बांधकामावर पावसाळा पूर्वी कारवाई का केली नाही. असा सवाल नागरिकांतून होत आहे.
ड्रेनेजलाइन व नाल्यांचे सर्वेक्षण खासगी एजन्सीकडून केले आहे. शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवाल तयार केले आहे. त्यामुळे नैसर्गिक नाले,ओढ्यावरील अतिक्रमण व बांधकामे लवकरच काढण्यात येणार आहेत.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता २, महापालिका…


















