न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.
नावासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पुण्याचं विमानतळ असलेलं लोहगाव हे जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही देखील हीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.