निगडीतील पीएमपीएल टर्मिनलमधील दोन प्लॅटफॉर्मवर हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- निगडी ते पिंपरी या विस्तारीत मार्गावर मेट्रोचे काम सुरू झाले आहे. निगडी येथील भक्ती-शफी समूह शिल्प चौक येथे मेट्रोचे स्टेशन बांधले जाणार आहे. त्यासाठी तेथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पीएमपीएल टर्मिनलमधील दोन प्लॅटफॉर्म तोडण्यात येणार आहेत.
पिंपरी ते दापोडी मेट्रो धावत आहे. पिंपरीच्या पुढे निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गिकेचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यासाठी जागोजागी बेरिकेट्स लावण्यात आले आहेत. तर, कामास अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येत आहेत. तसेच, दिव्यांचे खांब हटविण्यात येत आहेत.
मेट्रो स्टेशनच्या कामात निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पीएमपीएल टर्मिनलमधील प्लॅटफॉर्मचा अडथळा निर्माण होत आहे. तेथे एकूण ५ प्लेटफॉर्म आहेत. त्यापैकी दोन प्लॅटफॉर्म तोडण्यात येणार आहेत. स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर महामेट्रो पुन्हा ते प्लॅटफॉर्म बांधून देणार आहे. निगडी येथील ते दोन प्लॅटफॉर्म तोडण्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. त्यामुळे ते दोन प्लॅटफॉर्म लवकरच तोडण्यात येणार आहेत.












