न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना घडत आहेत. सर्वेक्षणानंतर नोटिसा दिल्यानतंरही अग्निसुरक्षितेबाबत (फायर सर्टिफिकेट) कार्यवाही न केल्यामुळे चिखली, कुदळवाडी व तळवडे येथील एकूण २६ गोदामे अग्निशमन विभागाने सील केल्या आहेत.
शहरातील बहुतांश व्यवसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आगीच्या दुर्घटना भविष्यात होऊ नयेत. यासाठी शहरातील आद्योगिक, व्यावसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात आले होते. सव्र्व्हेक्षणात अग्निशमन यंत्रणा उपलब्धता नसलेल्या व असुरक्षित, धोकादायक आस्थापनांना महापालिकेने सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी दोन वेळा नोटिसा बजावल्या आहेत.
त्यानतंरही अग्निसुरक्षितेबाबत कोणतीही कार्यवाही न केलेल्या मिळकतींचे पाणी व वीजपुरवठा बंद करण्याबाबत संबधित विभागांना कळविण्यात आले. त्या मिळकती सील करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली, कुदळवाडी व तळवडे भागातील आजपर्यंत २६ गोदामे व आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
नियमानुसार आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना करणे बंधनकारक आहे, व्यवसायकांकडुन अशा प्रकारची कार्यवाही होत नसल्याने ही कारवाई केलेली आहे. यापुढेदेखील ही कारवाई सुरुच राहणार आहे. कारवाई टाळण्यासाठी सर्व औद्योगिक, वाणिज्य, शाळा, रुग्णालये अशा व्यावसासिकांनी आवश्यक अग्निशमन यंत्रणा बसवून घ्यावी व अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र (फायर सर्टिफिकेट) प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.















