- पीएमआरडीए हद्दीत ‘फायर स्टेशन’ची कमतरता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) अग्निशमन केंद्रांसाठी तीस जागा आरक्षित आहेत. मात्र, सध्या केवळ तीन अग्निशमन केंद्र पीएमआरडीएकडे आहेत. मनुष्यबळाचा अभाव, वाहनांची कमतरता आणि प्रशासकीय अनास्था यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीएमआरडीएच्या हद्दीतील अग्निशामक केंद्र रखडले आहेत. यातील १० ठिकाणी पहिल्या टप्प्यात केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे महानगर प्रदेश (पीएमआरडीए) सुमारे ७२५६.४६ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि बेंगळुरूनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मेट्रो क्षेत्र आहे. पीएमआरडीए हद्दीत पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८१६ गावांचा समावेश असून, ७३ लाख लोकसंख्या आहे. मात्र, इतक्या मोठ्या क्षेत्रासाठी पुरेशी अग्निशमन केंद्र उपलब्ध नाहीत. पुणे व पिंपरी – चिंचवड या शहरांलगत पीएमआरडीएपी हद्द आहे. नागरिकरणासोबतच आगीच्या दुर्घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीत फायर स्टेशन (अग्निश्मन केंद्र) कमतरता भासत आहे.
पीएमआरडीएकडे वाघोली येथे स्वतःचे प्रशस्त अग्निशमन केंद्र आहे. मात्र, नांदेड सिटी आणि मारुंजी येथे हाउसिंग सोसायटीत उभारलेले केंद्र पीएमआरडीएच्या अग्निशमन विभागाकडून चालविण्यास घेतले आहे. तसेच बहुतांश वेळा पीएमआरडीएला एमआयडीसी, महापालिका, नगरपरिषद यांच्या अग्निशमन केंद्रांची मदत घ्यावी लागते. काही ठिकाणी खासगी कंपनीच्या अग्निशमन वाहनांना पाचारण करावे लागते.
पीएमआरडीएतर्फे पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. हवेली तालुक्यातील ओताडे हांडेवाडी, मांजरी, वडाचीवाडी, मावळ तालुक्यातील कान्हे आणि पाटण, दौंड तालुक्यातील केडगाव, खेड तालुक्यातील येवलेवाडी, पुरंदर तालुक्यातील दिवे, शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे पहिल्या टप्प्यात केंद्र उभारण्यात येणार आहेत.
पीएमआरडीए अग्निशमन विभागाकडून सध्या मारुंजी आणि नांदेड सिटी येथील सोसायटीमधील केंद्रांचे वाहन, मनुष्यबळ वापरतात. सोसायट्यांकडून हे केंद्र चालविण्याबाबत प्रस्ताव पीएमआरडीएने स्वीकारला. त्याबाबत पन्नास टक्के खर्च संबंधित सोसायटी उचलते. मात्र, हक्काची वाहने व मनुष्यबळ पीएमआरडीएकडे असणे आवश्यक आहे.
पीएमआरडीए तर्फे पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच कासार आंबोली येथील केंद्राचे बांधकाम सुरू आहे. लवकरच ते केंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित होईल. अग्निशमन केंद्राला मनुष्यबळदेखील उपलब्ध करून देण्यात येईल.
– डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पुणे महानगर (पीएमआरडीए)…












