- निवडणूक आयोग राज्यातील व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या तयारीत..
कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- राज्यात विधानसभा निवडणुकींचा कधीही बिगूल वाजू शकतो. निवडणूक आयोगाकडून, तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी १३ सप्टेंबरला घेतील. निवडणूक आयोगाच्या या वेगवान हालचालीमुळं सर्व राजकीय पक्ष, संघटना देखील अलर्ट झाल्या आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यात महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. महायुतीत पुढील काही दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. इतर छोट्या-मोठ्या संघटना आणि राजकीय पक्ष आपपाल्या मतदारसंघात ताकद वाढवण्यात गुंग आहे. यातच राज्य मुख्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो, असं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी १३ सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, पुणे, कोकण, मुंबई शहर आणि उपनगरचा दिवसभर आढावा घेणार आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा आढावा घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा असणार आहे. ईव्हीएम मशीन, मतदान कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्र, बूथ केंद्राचा प्रस्ताव, मतदार यादी, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष, नोडल अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेले ‘अॅप’ची स्थिती, वाहतूक व्यवस्था, टपाल मतदान प्रक्रिया आदींचा आढावा यात घेतला जाणार आहे.
















