- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून व्हॉट्सअॅप क्रमांक जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- नवीन फौजदारी कायद्यांमुळे आता नागरिकांना देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. त्यासोबतच आता व्हॉट्सअॅपवरून देखील तक्रार करता येते. त्यामुळे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यासाठी दडपण येत असलेल्या पीडित, तक्रारदारांना मोठा दिलासा
मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे ८७६७६५९३३१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर तक्रार करता येते. पूर्वीचा कायदा हा आरोपी केंद्रित होता; मात्र नवीन कायदा न्यायकेंद्रित आहे. या बदलांनुसार आता छायाचित्रण, सीसीटीव्ही चित्रण, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले संभाषण, फोन रेकॉर्ड, लोकेशन आदी तांत्रिक पुराव्यांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे.
तसेच अनेकांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचे दडपण असते. त्या अनुषंगाने आता व्हॉट्सअॅपवरूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कुठुनही तक्रारदाराला तक्रार नोंदवता येणार असल्याने तक्रारदाराला तक्रार नोंदवणे आता सोपे झाले आहे. मात्र पुढील तीन दिवसांत पीडित, तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतो. अनेकदा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ हजर होणे शक्य नसल्याने तक्रारदारांना फायदा होणार आहे. आता व्हॉट्सअॅप- वरून देखील तक्रार करता येते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ४ मे २०२४ पासून तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तेव्हापासून २० तक्रारी या क्रमांकावर उपलब्ध झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या https://pcpc.gov.in/ या वेबसाईटवर तसेच पोलिस ठाण्यांच्या दर्शनी भागात तक्रारीसाठीचा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. पीडित, तक्रारदारांनी कोणतेही दडपण न घेता तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तत्काळ तक्रारीची दखल घेण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना केल्या आहेत. व्हॉट्सअॅपवरून देखील तक्रार करता येते. व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. – विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड…











