न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने ‘बॅड टच’ करून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुला घरी सोडू का, असेही तो एका विद्यार्थिनीला म्हणाला. संबंधित कर्मचाऱ्याला दापोडी पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली. महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडी येथील एका शाळेत ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
सरफराज मन्सूर शेख (३२, रा. कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणी भोसरी (दापोडी) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दापोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा फुगेवाडी येथील एका शाळेत कर्मचारी आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना भेटून शेख याने बॅड टच केल्याचे सांगितले. माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबत शेख याने असाच प्रकार केला. ‘तुला घरी सोडू का’, असेही शेख एका मुलीला म्हणाला, असेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तात्काळ भोसरी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शेख याचा शोध घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी संबंधित इंग्रजी माध्यमिक शाळा एका खासगी संस्थेला चालविण्यास दिली. या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड आणि भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेकडे आहे. तसेच शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविणे ही जबाबदारी संस्थेची असून, दोन महिन्यांपूर्वी संस्थेकडे कारभार सोपविला असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

















