न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्नालयांतर्गत बीएस्सी नर्सिंग कॉलेज संस्थेचे नाव ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय’ असे नाव निश्चित करण्यात आले आहे तर पॅरामेडीकल कोर्सेससाठी असलेल्या संस्थेचे नाव ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका पॅरावैद्यकीय प्रशिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय’ असे निश्चित करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या बीएस्सी नर्सिंग कॉलेज आणि पॅरामेडीकल कोर्सेस संस्थेला आवश्यक प्रमाणपत्र आणि संलग्नता मिळण्यासाठी संस्थेची नावे निश्चित करणे आवश्यक होते. या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांतर्गत बी.एस्सी नर्सिंग कॉलेज सुरु करण्याच्या विषयास राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली होती. त्यानुषंगाने शासनाकडील वैधानिक तपासणी समिती प्राथमिक तपासणी करून संस्थेला आवश्यकता प्रमाणपत्र आणि संलग्नता मिळण्यासाठी MUHS कडे शिफारस करते, परंतु महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी या संस्थेचे नाव निश्चित करणे गरजेचे होते. त्यानुसार आज झालेल्या विशेष बैठकीत बीएस्सी नर्सिंग कॉलेजचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिचर्या विज्ञान संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (pcmc, institute of nursing sciences Y.C.M. hospital) असे निश्चित करण्यात आले असून पॅरामेडीकल कोर्सेस संस्थेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका पॅरावैद्यकीय प्रशिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (pcmc paramedical training institute Y.C.M.Hospital) असे निश्चित करण्यात आले आहे. या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली आहे.












