- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधले शिवबंधन..
- चिंचवडची उमेदवारी देण्याचा ठाकरेंचा शब्द?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अखेर अजितदादांची साथ सोडली आहे. त्यांनी आज शुक्रवारी थेट मातोश्री गाठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खा. संजय राऊत उपस्थित होते.
दरम्यान त्यांना थेट चिंचवडमधून विधानसभेची उमेदवारीचे देण्याचा शब्द मिळाला असल्याचे सूत्रांकडून समजते. अद्याप तशी शिवसेनेकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी, अजित पवारांच्या पक्षाची मात्र, भलतीच कोंडी झाली आहे. याचा फटका त्यांना महायुतीतील जागा वाटपात नक्कीच बसू शकतो.
मागील पंधरवड्यात पिंपरीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भोंडवे यांनीही बंडाचे निशाण फडकावले होते. त्यातच चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांचे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना पक्षाकडून चिंचवडची उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यामुळे चिंचवडची जागा भाजपच्याच पदरात पडणार नाही, असा कयास लावूनच बंडखोर भोंडवे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत उद्धव सेनेच्या शिवसेनेशी घरोबा केला आहे. एवढी मोठी खेळी केवळ चिंचवडच्या जागेसाठीच त्यांनी केली असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.











