न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- लॉकडाऊनमुळे मुद्रांक उपलब्ध नाही. मुद्रांक विक्री बंद आहे. त्यामुळे वकील, नोटरी व सर्वसामान्य नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पर्यायाने, सर्वांचेच आर्थिक नुकसान होत आहे. तरी, मुद्रांक विक्री पुन्हा चालू करावी, अशी मागणी पिंपरी – चिंचवड नोटरी असोसिएशनने केली आहे.
असोसिएशनकडून अध्यक्ष अॅड. पी. डी. नांगरे, उपाध्यक्ष अॅड. दीपक ओव्हाळ यांनी याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे) यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासकीय कामे तसेच न्यायालयाची कामे, इतर परवानग्या, बँकसाठी शपथपत्र आणि अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज आदी कामांसाठी शंभर व पाचशे रुपयांचे स्टॅम्प ( मुद्रांक ) व तिकीट विक्री १५ मार्चपासून बंद आहे. त्यामुळे सर्व वकील व नोटरी यांच्याकडील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे त्वरीत नूतनीकरण करून स्टॅम्प विक्री सुरू करावी.