- पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला?..
- शहरात दहशतीचे सावट; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला आहे. लागोपाठ तडीपार केलेले आरोपी शहरात दाखल होत आहेत. शहरात दाखल होताच कोयता हे सशस्र हत्यार हातात घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यामुळे शहरात दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या तोकड्या कारवाईला तडीपार आरोपी बधत नाहीत. पुन्हा काही दिवसातच दुसरा तडीपार आरोपी शहरात दाखल होऊन पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण करीत आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाईची पद्धत बदलावी लागेल, अशी शक्यात निर्माण झाली आहे.
दरम्यान पिंपरी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने एकाच दिवशी दोन कारवाया करून कोयताधारी दोन तडीपार तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले आहे. पहिली कारवाई (दि. २५) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास भिमनगर, पिंपरी येथे केली. कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या तरुणाला पोलिसांनी तब्यात घेतले आहे. आदित्य राम सुर्वे (वय २०, रा. भिमनगर, पिंपरी) असं आरोपीच नाव आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हे हत्यार जप्त केले आहे. पिंपरी पोलिसांनी ३९४/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पो.ना. जाधव पुढील तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई (दि. २५) रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास आंबेडकर पुतळयाचे मागे, आंबेडकर चौक, पिंपरी येथे केली. दोन वर्षांसाठी तडीपार असताना पोलिसांच्या मनाई आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या तरुणाला पोलिसांनी तब्यात घेतले आहे. दत्ता संतोष धोत्रे (वय २१ वर्ष, रा. गणेश हौ. सोसा. ओटास्किम, निगडी) असं आरोपीच नाव आहे. त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता हत्यार जप्त केले आहे. पिंपरी पोलिसांनी ३९३/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पो. हवा. सोनमाळी पुढील तपास करीत आहेत.