न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- मोशी येथील कचरा डेपोत काही दिवसांपूर्वी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कचरा डेपोत हा मृतदेह कसा आला, यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर भोसरी एमआयडीसी पोलीसांकडून गुन्ह्याचा शोध लागला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
विनोद मधुकर शिंदे (वय ३२, रा. गणेशनगर, गवळीमाथा, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास मधुकर शिंदे (वय २३ रा. गणेशनगर, गवळीमाथा, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोहर शिवाजी कांबळे (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृत विनोद शिंदे कचरा गोळा करून उदरनिर्वाह करत होते. आरोपी मनोहर कांबळे आणि विनोद शिंदे हे मित्र होते. काही दिवसांपूर्वी विनोद आणि मनोहर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून मनोहर याने विनोद यांचा खून करून मृतदेह मोशी येथील कचरा डेपो जवळ टाकून दिला होता.