- मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत आदेश जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- लॉकडानमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या व्यायामशाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दसरा म्हणजेच २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी व्यायामशाळा चालकांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीत त्यांनी व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. पण स्टीम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार करोना प्रतिबंधाबाबतच्या नियमावलीनुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आदेशात काय म्हटलं आहे
संपूर्ण राज्यभरात २५ ऑक्टोबरपासून जिम सुरु करण्यासाठी परवानगी देत आहोत. ही परवानगी कंटेनमेंट झोनबाहेरील जिमसाठी आहे. यासंबंधीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येईल. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियम लक्षात घेतले जातील. करोनासंबंधित सर्व नियमांचं पालन केलं जावं.
मुंबईत ८५० तर राज्यात सुमारे ५ हजार व्यायामशाळा आहेत. या व्यवसायावर ५० हजार लोक अवलंबून आहेत. लाखो रुपयांचे भाडे, वीजबिल द्यावे लागत आहे. कर्जाचे हप्ते चुकवणे कठीण झाले आहे. उपकरणे जप्त करण्याचा इशारा बँका आणि देणेकरी देत आहेत, अशी व्यथा व्यायामशाळाचालकांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडली होती.
नियमावली काय?
व्यायामशाळा सदस्यांना संपूर्ण नियमावलीची माहिती द्यावी.
व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.
प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टींबरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे.
व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे, उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.
दररोज रात्री व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
सामूहिक व्यायाम प्रकार झुम्बा, स्टीम, सौना बाथ बंद राहणार.