- सोळा ठिकाणी कॅमेरे बसविण्याची दिनेश यादव यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- कुदळवाडी आणि चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोळा ठिकाणी कॅमेरे बसवून देण्याची मागणी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पालिकेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना दिले आहे.
कुदळवाडी तसेच चिखलीतील रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढून नागरिकांचे मोठे स्थित्यंतर झाले आहे. नागरी वस्तीच्या घनतेमुळे रहदारी आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महिला, कामगार, वयस्कर मंडळी तसेच लहान मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक भागात अडचणी आहेत आणि अनावधानाने काही बरे वाईट झाल्यास शोध घ्यायला पुरेशी यंत्रणा नाही.
जर या भागात कॅमेऱ्याने नजर ठेवली गेली तर यंत्रणेला दिलासा निश्चितपणे मिळू शकतो. त्यामुळे या भागातील संवेदनशील अशा मोरे पाटील चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर चौक, पवार वस्ती उड्डाणपूल चौक, इंद्रायणी वजनकाटा चौक, महादेव मंदिर, गणेश मंदिर तथा पोलीस चौकी, मोई चौक, चिखली चौक, चिखली स्मशानभूमी, कुदळवाडी मनपा शाळा, घरकुल चौक, हरगुडेवस्ती चौक, बालघरे वस्ती चौक, जय गणेश वजनकाटा चौक, डायमंड चौक अशा सोळा ठिकाणी मनपाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे बसवावेत, अशी मागणी यादव यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून दिले. त्यावेळी स्विकृत सदस्य संतोष मोरे, रामचंद्र लांडगे, विजय तापकीर आदी उपस्थित होते.