- मात्र, अजितदादांच्या मुशीत तयार झालेल्या कारभाऱ्यांच्या मनात काय?
- काटे, लांडगे की ऐनवेळी हुकमी एक्का…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपमधील विविध गटांत चुरस सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप समर्थक म्हणून शत्रुघ्न काटे आणि निष्ठावंत गटाकडून रवी लांडगे यांची नावे आघाडीवर आहेत.
मात्र, अजितदादांच्या मुशीत तयार झालेले भाजपचे दोन्ही आमदार नगरसेवक काटे व लांडगे यांना बगल देऊन आपला हुकमी एक्का ऐनवेळी पेश करतील, अशी चर्चा सध्या शहरात सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समिती अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपातील तीनही गट सक्रिय झाले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक अशी रवी लांडगे यांची जमेची बाजू आहे तर, आमदार जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून शत्रुघ्न काटे यांची ओळख आहे. त्यामुळे काटे की लांडगे यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार? की ही जोडी ऐनवेळी या दोघांना बाजूला सारून, वेगळ्याच उमेदवाराचे नाव जाहीर करून सर्वांना बुचकळ्यात टाकणार, असा कयासही अनेकांनी बांधला असल्याचे सूत्रांकडून समजते.