- मास्कचा वापर न करणाऱ्या ४०० नागरिकांकडून दोन लाखांचा दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या ४०० नागरिकांवर शनिवारी कारवाई करून दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. संचारास निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा पोलिसांकडून उगारण्यात आला आहे.
प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले जात आहेत. पोलिसांनी शनिवारी २१२ नागरिकांवर अशी कारवाई केली.
यात एमआयडीसी भोसरी ( ११ ), भोसरी ( ६ ), पिंपरी ( ९ ), चिंचवड ( ५२ ), निगडी ( २२ ), आळंदी ( १७ ), चाकण ( १३ ), दिघी ( ४ ), म्हाळुगे चौकी (२६), सांगवी ( ७ ), वाकड ( १४ ), हिंजवडी ( ५ ), देहूरोड ( १२ ), तळेगाव एमआयडीसी ( १३ ), शिरगाव चौकी ( १ ). शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून यात वाढ करून कारवाई अधिक प्रभावी करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे.