- कोरोना नियमांचे पालन न करणा-या १८ हॉटेलवर कारवाई..
- शहरात १९ ठिकाणं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित; आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णवाढीचा दर वाढत असून नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हि चिंतेची बाब असून नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरामध्ये सध्या लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसून नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोना वाढ रोखणे शक्य होईल असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरामध्ये भरारी पथकांची नियुक्ती केली असून या पथकांद्वारे मास्क न लावणा-या आणि रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, समारंभांच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन कोरोना विषयक नियमांचे पालन होते कि नाही याबाबत तपासणी करणे तसेच गर्दीच्या ठिकाणांवर कारवाई करणे यांसारख्या कारवाया केल्या जात आहेत.
शहरात कोरोना नियमांचे पालन न करणा-या १८ हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात विना मास्क फिरणा-या आणि रस्त्यांवर थुंकणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणेसाठी प्रभाग निहाय ८ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विना मास्क फिरणा-या नागरिकांकडून एकूण १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर थुंकणा-या नागरिकांकडून एकूण ८ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील १९ ठिकाणं सध्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून पिंपरी, भोसरी, दिघी, मोशी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागांमध्ये रुग्णवाढ झाली आहे. कोरोना विषयक नियमांचे पालन न करणा-यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.