न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बीआरटीएस विभागामार्फत शहरात मार्चपासून पार्किग धोरण राबविण्याची तयारी सुरू आहे. परंतु, अगोदरच कोरोनामुळे शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलेले आहे.
प्रचंड प्रमाणात महागाईसुद्धा वाढलेली आहे. मात्र, पालिका नागरिकांच्या हिताचा विचार करताना दिसत नाही. सर्वसामान्यांवर पार्किंग वसुली लादत आहे.शहरवासीयांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण होत आहे. त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे.
पार्किंग धोरणाला पालिकेने तत्काळ स्थगिती द्यावी. अन्यथा आम्ही आमच्या संघटनेकडून तीव्र आंदोलन करून पार्किंग धोरण बंद पाडू, असा इशारा शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजय यादव यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना दिला आहे.