- दोन लाखांपेक्षा अधिकच मुद्देमाल जप्त; चौघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मार्च. २०२१) :- विक्रीसाठी गुटख्याची साठवणूक केलेल्या ठिकाणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. या कारवाईत एक लाख चार हजार ९९४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. जाधववाडी, चिखली येथे सोमवारी (दि. १) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
तोयाराम ऊर्फ दिनेश चोराराम चौधरी (वय २५, रा. जाधववाडी) याच्यासह इतर तीन आरोपींच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथे चेतन जाधव यांच्या रूममध्ये गुटखा साठवल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. येथे या कारवाईत एक लाख ४ हजार ९९४ रुपयांचा गुटखा, पाच हजार ३३० रुपये रोख रक्कम, ३५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल तसेच ५८ हजार रुपये किमतीची दुचाकी, असा दोन लाख तीन हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.