- बालगुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढल्याचे दिसून येते. अशा बाल गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने शाळा का सोडली, पुन्हा शाळेत का गेला नाही, अशी माहिती पोलीस घेणार आहेत. बाल गुन्हेगारांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येणार आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे.
शहरात १४ ते १५ वयोगटातील ओठावर मिसरूडही न फुटलेली मुले गुन्हेगारी कृत्य करतात. या मुलांकडून अजाणत्या वयातच असे कृत्य केले जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर विधिसंघर्षित बालक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यातील अल्पवयीन मुलांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी डेटा तयार केला आहे.
गुन्हेगारी कृत्य करणारी अल्पवयीन मुले कोणत्या शाळेत शिकतात, शाळ सोडली आहे का, शाळा का सोडली, कोणत्या इयत्तेपासून सोडली, सध्या काय करतो, कुठे राहण्यास आहे. कुटुंबात किती सदस्य आहेत. त्यांची माहिती, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, संबंधित अल्पवयीन मुलगा कोणाच्या संपर्कात येतो. त्याला गुन्हेगारी कृत्य करण्यास कोण भाग पाडतो, त्याच्या सवयी, व्यसन, अशी माहिती पोलीस घेणार आहेत. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी कृत्य करण्यापासून तसेच व्यसनांपासून परावृत्त करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे देखील प्रबोधन करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाचे शिक्षण कसे पूर्ण करता येईल. आढावा घेण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलाचा गुन्हेगारी कृत्यांमधील वाढता सहभाग चिंताजनक आहे. शहरातील बालगुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बालगुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
– अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी – चिंचवड…