- अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण जूनपासून लागू करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. 18 मे 2025) :- अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आक्रोश महाआंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.
हे आंदोलन मंगळवारी २० मे २०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला होणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून २०२५ पासून लागू करावे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल.
आंदोलकांच्या मते, “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी आंदोलकांची मागणी आहे.
विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे, दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण आदी नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.











