- प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची ग्रामस्थांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ नोव्हेंबर २०२६) :- मोशी कचरा डेपोमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनासह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले. मोशीतील ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
मोशी डेपोची क्षमता, पर्यावरणीय परिणाम आणि कार्यपद्धतीची तांत्रिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच संपूर्ण शहराचा कचरा एकाच ठिकाणी टाकण्याऐवजी प्रत्येक प्रभागात स्वतंत्र आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा आग्रह धरला.
कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित द्रव (लिचेट) इंद्रायणी नदीत मिसळत असल्याच्या तक्रारीची चौकशी करून नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणीही करण्यात आली. डेपो परिसरातील हवा, पाणी आणि मातीची नियमित तपासणी तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, सुजाता बोराटे, सारिका गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
“मोशीकरांनी भेट घेऊन कचरा डेपोमुळे भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांच्या मागण्या मांडल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि इंद्रायणीचे संरक्षण यांना प्राधान्य देत या मागण्यांबाबत महापालिका प्रशासनाकडे आणि प्रसंगी राज्य शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करू. कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कालबद्ध उपाययोजना व्हाव्यात, यासाठी आग्रही आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा…


















