- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोहेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आधुनिकीकरणासह शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) रोजी दुपारी १.३० वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी प्राधिकरण येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पोलिसांच्या आधुनिक सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. यामध्ये तब्बल ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, ४ ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ताथवडे येथे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी मंजूर झालेल्या जागेच्या सातबारा उताऱ्याचे अधिकृत हस्तांतरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सार्वजनिक सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही आणि इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.
याशिवाय पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या संकुलात पिंपरी पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ कार्यालय, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय तसेच २०० शासकीय निवासस्थानांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘नशामुक्त पिंपरी-चिंचवड अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थी आणि नागरिकांशी ‘बहुआयामी टाउनहॉल’च्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे.


















