- संत तुकाराम नगर पोलिसांची दादागिरी..
- आम आदमी पार्टीकडून पोलीसांवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २ नोव्हेंबर २०२६) :- आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवत आयुक्तांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी भेट नाकारली. उलट लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी आणि नागरिकांना पोलिसांच्या माध्यमातून स्थानबद्ध करण्यात आले. ही प्रशासनाची दडपशाही असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आंदोलकांशी अरेरावी करत एका नागरिकाची कॉलर पकडून त्यांना महापालिका भवनाबाहेर काढल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला. नागरिकांच्या करातून वेतन घेणारे पोलीस आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत की भ्रष्ट प्रशासनाचे रक्षक, असा सवालही पक्षाने उपस्थित केला.
या आंदोलनादरम्यान रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, अमित म्हस्के, संजय कोने, वैजनाथ शिरसाट, विकी पासवर्ड, सुप्रिया गायकवाड, कविता कोंडे, सुरेश बावनकर, योगेश बाबर आणि रेश्मा बाबर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या गैरवर्तनाविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात येणार आहे. महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

















