- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२५) :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नीलेशला नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतल्याचे वृत्त असून पोलिसांच्या गुंडाविरोधी पथक आणि युनिट चारने ही कारवाई केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी असून नुकतेच पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट काढले होते. १६ मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू होते.
वैष्णवीचे बाळ हे कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या नीलेशकडे होते. गेल्या आठवड्यात बाळाला आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाशी नीलेशने वाद घातला आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवला होता. या प्रकरणी नीलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच नीलेश पसार झाला होता.
नीलेश चव्हाणविरोधात २०२२ मध्ये वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आपल्या पत्नीचे घरात स्पाय कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीनेच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

















