न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी पुलाजवळ डिलिव्हरी बॉयला धमकावून मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी पहाटे घडला होता.
फिर्यादी प्रणय कुमार स्वाईन (वय ३८, रा. विजय नगर, काळेवाडी) हे मोटारसायकलवरून जात असताना गोकुळ हॉटेलसमोर एका भटक्या कुत्र्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या रिक्षातील तिन युवकांनी “ब्रेक का मारला, आम्ही पडलो असतो, भरपाई दे” असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर फिर्यादीकडील १० हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याचबरोबर धमकी देत त्यांच्या मोबाईलवरील फोनपे अॅपमधून तीन वेळा एकूण ६,५०० रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी सुदर्शन महादेव थोरात (वय १८, भारतनगर, पिंपरी) व यश चंदू कांबळे (वय १८, भारतनगर, पिंपरी) अशी दोन आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास पोउपनि केणे करत आहेत.













