- मंडप परवानगी अर्ज तातडीने निकाली काढण्याबाबत सुचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- राज्य सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आदी विभागांची संयुक्त आढावा बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत विसर्जन घाटांचे नियोजन, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा आदींबाबत सूचना देण्यात आल्या. सिंह यांनी मुख्य विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजवणे, धोकादायक केबल व वायर्स शिफ्ट करणे, कृत्रिम हौद उभारणे, पीओपी व शाडू मूर्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी जीवरक्षक, आपत्ती मित्र व अग्निशमन जवान तैनात करण्याचे निर्देश दिले.
शहरभर स्वच्छतेची मोहीम राबवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, झाडांच्या फांद्यांची छाटणी व मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. गणेश मंडळांच्या मंडप परवानगीसाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकखिडकी कक्ष सुरू असून, आलेले अर्ज तातडीने निकाली काढावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस वरिष्ठ पोलीस अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व विभागप्रमुख उपस्थित होते.













