न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून मान्यता दिली आहे. पुण्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. देशासह परदेशातून हजारो भाविक पुण्यातील प्रमुख मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुणे मेट्रो सकाळी ६ वाजेपासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार आहे. तसेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे ६ सप्टेंबरच्या सकाळपासून ७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे. त्याआधी २६, २७ व २९ ऑगस्टला मेट्रो सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नियमित धावेल.
यंदा विशेष बाब म्हणजे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मार्गावरील स्थानकांचा शुभारंभ झाला आहे. या मार्गावरील जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट स्थानके पुण्याच्या मध्यवस्तीत असून इथेच प्रमुख गणपती मंडळे आहेत. त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडी टाळून थेट मेट्रोद्वारे मध्यवस्तीतील मंडळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
या निर्णयाचा लाभ पुणेकरांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनाही होणार असून भाविकांना रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.













