न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज घेतलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७७ तक्रार वजा सूचना नागरिकांकडून नोंदविण्यात आल्या. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांत ही सभा आयोजित केली जाते.
आज झालेल्या सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांत अनुक्रमे ३, १२, १२, १२, ६, १३, २ आणि १७ अशा तक्रारी व सूचना मांडल्या गेल्या.
यामध्ये रस्त्यांवरील उड्डाणपूल, वाहतूक नियोजन, महिलांच्या शौचालयांची दुरुस्ती, गणपती मंडळांना परवानगी प्रक्रियेतील विलंब, खड्ड्यांची डागडुजी, भाजीपाला मार्केटसाठी प्रशस्त जागा, तसेच मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणे आदी मागण्या प्रामुख्याने पुढे आल्या.
महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या सभांमुळे तक्रारी तत्काळ ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास मदत होत असल्याचे समन्वय अधिकाऱ्यांनी सांगितले.













