- महापालिका आयुक्त शेखर सिंहांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज सकाळी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सोयीसुविधा आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यास महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, कार्यकारी अभियंता हरविंदसिंह बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
मोशी खाण येथे पाहणी करताना आयुक्त सिंह म्हणाले, “येथील रस्त्यांवर मुरूम टाकून डागडूजी करावी. आठही प्रभागांतून येणाऱ्या मूर्ती विसर्जनासाठी पुरेशी कर्मचारी यंत्रणा, आरोग्य विभाग व सुरक्षा रक्षकांची पथके नियुक्त करा. सीसीटीव्ही, लाईट्स, मंडप, पिण्याचे पाणी आदी सर्व सुविधा उपलब्ध ठेवा.”
यानंतर त्यांनी मोशीतील इंद्रायणी नदी घाट, पिंपरीतील पवना नदीवरील झुलेलाल घाट, सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट यांचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले, “विसर्जन घाटांवर गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा. निर्माल्यकुंड व कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता प्राधान्याने करा. घाटांवर सुशोभीकरण, दिशादर्शक फलक, जीवनरक्षक, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित ठेवा.”
पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींची नोंद ठेवा…
आयुक्त शेखर सिंह यांनी घाटांवर विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्तींची काटेकोर नोंद ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. मूर्ती पीओपीची आहे की शाडू मातीची, तिची उंची पाच फूट किंवा त्याहून अधिक आहे का, याची माहिती स्वतंत्रपणे नोंदवावी, असे निर्देश त्यांनी दिले.













