न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तब्बल ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी अभिषेक अशोककुमार सिंग (वय ४०, रा. कासारसाई, पुणे) यांना आरोपींनी स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीवर ७.५ कोटी रुपयांचा नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. परंतु नफा आणि मूळ रक्कम देण्याऐवजी २० टक्के कमिशनची मागणी करून रक्कम परत केली नाही.
या प्रकरणी पोलिसांनी स्नेहा सरडा व नेमकुमार या आरोपींसह संबंधित मोबाईल नंबरधारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून, तपास पोनि नाळे करत आहेत.













