न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- विद्यानगर परिसरात कौटुंबिक वादातून तरुणाने पत्नीवर तसेच तिला वाचविण्यास आलेल्या सासू आणि पुतण्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता चिंचवड येथे घडली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष राजू कांबळे (वय २४, रा. शंकरनगर, चिंचवड) याने चारित्र्यावरील संशयाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी तिची आई आणि पुतण्या आदित्य पुढे आले असता, आरोपीने त्यांच्यावरही वार केले. आदित्यच्या मानेवर चाकूने हल्ला झाला, तर फिर्यादी पिडीतेची फिर्यादी आई हिच्या हातावर गंभीर जखमा झाल्या.
या घटनेदरम्यान परिसरातील नागरिक आरडाओरड ऐकून घटनास्थळी धावले असता आरोपीने “मी या परिसराचा भाई आहे, कोणी मध्ये आला तर संपवून टाकीन” अशी धमकी देत चाकू हवेत फिरवून दहशत निर्माण केली. नागरिक भयभीत होऊन घटनास्थळावरून पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.