- आकर्षक क्रमांकांसाठी आगाऊ अर्ज आणि लिलाव प्रक्रिया जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय (मोशी) येथे दुचाकींसाठी ‘MW’ आणि चारचाकींसाठी ‘MV’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. आकर्षक क्रमांकांसाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आरटीओने आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे.
चारचाकी वाहनांसाठी अर्ज २४ ऑक्टोबर, तर दुचाकींसाठी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवताना तीनपट शुल्क भरावे लागेल.
अर्जासोबत डी.डी., पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. डीडी DY. RTO, Pimpri-Chinchwad यांच्या नावे पुणे येथील नॅशनलाईज्ड / शेड्युल्ड बँकेचा असावा.
चारचाकींची यादी २७ ऑक्टोबर व दुचाकींची २८ ऑक्टोबर रोजी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता पात्र अर्जदारांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया होईल. सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्याला पसंती क्रमांक दिला जाईल.
आरक्षित क्रमांक बदलता येणार नाही. १८० दिवसांत वाहन नोंदणी न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल आणि फी सरकारजमा होईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी प्रसिद्धीस दिली आहे.