न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित ‘अभंग दिवाळी मेळा’ देहूतील सरस्वती मंगल कार्यालयात दि.१५ व १६ ऑक्टोबर रोजी भरविण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळी मेळ्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स्, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, तोरणं, रांगोळीचे स्टीकर्स, किल्ल्यांसाठी विविध प्रकारची मावळ्यांसह चित्रे, पूजेचे साहित्य, मेहंदी, टॅटू, मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, जादूचे खेळ, अभ्यासाला चालना देणाऱ्या खेळणी या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पालकांनी बहुसंख्येने अभंग दिवाळी मेळ्यात मुलांसोबत सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
यावर्षी दिवाळी मेळ्यातून येणारा नफा आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या मुलांचे संगोपन व शिक्षण करणाऱ्या “स्नेहवन” या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे. स्नेहवन मधील मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा याकरिता त्यांना अभंग दिवाळी मेळ्यात निमंत्रित केले होते. स्नेहवन संस्थेची ७० मुले दिवाळी मेळ्यात प्रत्यक्ष सहभागी झाली होती. यावेळी मुलांनी विविध प्रकारचे खेळ, जादूचे प्रयोग, दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करुन दिवाळी या सणाचा आनंद घेतला. मुलांसमवेत स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चनाताई देशमाने हे देखील उपस्थित होते. अभंग दिवाळी मेळ्याच्या निमित्ताने आकाशकंदील, पणत्या, सुगंधी उटणे अशा दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्नेहवन परिवाराला दिवाळीची भेट म्हणून देण्यात आल्या.
आजच्या काळात मुलांमध्ये सेवाभाव, संवेदनशीलता व दातृत्वाची भावना निर्माण करणे गरजेचे आहे, हेच काम अभंग दिवाळी मेळा दरवर्षी करत आहे. या आनंदासोबतच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न देखील या उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो.
दि.१५ ऑक्टोबर रोजी पूर्व प्राथमिक विभाग व इ.पहिली व दुसरीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. दि.१६ ऑक्टोबर रोजी इ.३ री ते ७ वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक यांच्याहस्ते दिवाळी मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भसे, योगाचार्य दत्तात्रय भसे या मान्यवरांच्या शुभहस्ते स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने व अर्चनाताई देशमाने या दाम्पत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद, माजी उपसरपंच सचिन कुंभार, संचालक प्रशांत काळोखे, सौरभ कंद आदी उपस्थित होते. दिवाळी मेळाचे यशस्वी आयोजन करण्यासठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.