न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- भारतीय संस्कृतीतील प्रमुख सण दीपावलीचा शुभारंभ गोवत्स पूजन, वसुबारस या मंगलदिनी झाला. चिंचवडगाव येथील श्री धनेश्वर महादेव मंदिर गोशाळेत पारंपरिक पद्धतीने गोवत्स पूजन सोहळा संपन्न झाला. देवदेवतांचा वास असलेल्या या पवित्र स्थळी एका गोमातेपासून सुरुवात झालेल्या गोसेवेचा आज विस्तार होऊन चाळीस गायी व वासरांचे संगोपन येथे केले जाते.
पंचेचाळीस वर्षांच्या अखंड परंपरेनुसार ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्रोच्चारांत, तुळशीराम वाघ यांच्या नगारा वादनात, तसेच सोहम शिगवण यांच्या बासरीच्या मंगलधुनीत सुवासिनींच्या शुभहस्ते गोवत्स पूजन करण्यात आले.
या निमित्ताने मंदिर परिसरात सडा-रांगोळी, विद्युत रोषणाई आणि दीपोत्सवाचा देखणा अविष्कार साकारण्यात आला होता. भाविकांनी कुटुंबासह गोमातेचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
या मंगल प्रसंगी श्री धनेश्वर विश्वास मंडळ, भक्तगण आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
दीपावलीच्या या प्रारंभीच्या सोहळ्याने चिंचवडगावात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंदाचा माहोल निर्माण झाला.